Pune : रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; चौघांचा मृत्यू, आठजण जखमी

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला उभे केलेले अवजड होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा अचानकपणे रस्त्यावर कोसळून त्याखाली सहा रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेत जुना बाजार चौकात घडली.

अपघातामध्ये भगवानराव धोत्रे (वय ४८), भीमराव कासार (वय ७०), शिवाजी देविदास परदेशी (वय ४०), जावेद मिसबाऊद्दीन खान (वय ४९), यांचा मृत्यू झाला. उमेश धर्मराज मोरे (वय ३६), किरण ठोसर (वय ४५), यशवंत खोबरे (वय ४५), महेश यशवंतराव विश्वेश्वर (वय ५०), रुक्मिणी परदेशी (वय ५५), देवांश परदेशी (वय ४), समृद्धी परदेशी (वय १८) गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे हे होर्डिंग उभे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली असून जुना बाजार रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

आईवर अंत्यसंस्कार करून दोन मुली आपल्या वडिलांबरोबर रिक्षामधून परत येत असताना दुर्दैवाने या रिक्षावर होर्डिंग कोसळले. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू असताना ही दुर्घटना झाली असून या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे.

रेल्वेकडून याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.