Pune : दोषारोप करून इतिहास कसा बदलता येईल? – अभय छाजेड

एमपीसी न्यूज – इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार (Pune) अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेहरूंनी संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याआधी युद्धबंदी केली नसती तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भूभागही भारताकडे राहिला असता. ही टीका करताना पंडित नेहरूंवर चूक केल्याचा आरोप करत असता जम्मू-काश्मीरचे तत्कालीन संस्थानिक हरीसिंग यांच्या घोडचुकीकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करून नेहरुंनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा अजेंडा राबवला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांनी सुनावले.

हरिसिंग यांनी भारतात सामील होण्यास विनाकारण विलंब लावला. महात्मा गांधींनी प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन हरिसिंगांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण हरीसिग त्यालाही बधले नाहीत कारण त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. त्यांना तसे भडकावणारे हिंदू महासभेचे एक सर्वेसर्वा होते.

हरीसिंगांच्या निर्णय घेण्यातील विलंबाचा गैरफायदा घेत पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले तेंव्हा कोठे हरिसिंग यांना जाग आली व पंडित नेहरूंकडे लष्करी सहाय्याची मदत मागितली. गांधीजींनीही या लष्करी मदतीला अनुमती दिली. तरीही सामील होतांना हरिसिंग यांनी आपला हट्ट सोडला नाही व त्यातूनच त्यांच्याच हट्टाने 370 कलमाची निर्मिती झाली, अशी आठवणही छाजेड यांनी करून दिली.

भारतीय सैन्याने पाकपुरस्कृत टोळीवाल्यांना खो-यातून हाकलण्यात यश मिळवले, पण युनोने (नेहरूंनी नव्हे) युद्धविराम घोषित केल्याने पुढील भाग आजतागायत तसाच पाकच्या ताब्यात राहिला. नवजात राष्ट्राला देशातील साडेपाचशे संस्थाने विलीन करून घ्यायची होती आणि अनेक आघाड्यावर संघर्ष करत राष्ट्राची उभारणी करायची होती.

तरीही पंडित नेहरूंनी देशाची घटना अंमलात आल्यापासून (1950) 370 कलमांतर्गत येणा-या तरतुदी एकामागून एक रद्द करत नेण्याला सुरुवात केली आणि ते शेवटी नावालाच राहिले.

NCP : खेळाडू दत्तक योजनेचा महापालिकेला विसर?

हरीसिंगांनी भारतात सामील होण्याचा निर्णय बेळीच घेतला असता (Pune) तर मुळात हा प्रश्नच उद्भवला नसता हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पण या नावालाच राहिलेल्या कलमाला रद्द करून राष्ट्रप्रेमाचा डंका बडवणे एवढेच माहित असलेल्या अमित शहांनी अशा स्थितीत हरीसिंगांच्या भारतात सामील व्हायचा निर्णय पाक आक्रमणाच्या विपरीत स्थितीत व उशीरा घेण्याच्या अदूरदृष्टीला दोष देण्याऐवजी देशाची भक्कम उभारणी करणा-या पंडित नेहरुंना दोष देणे म्हणजे काही लोकांच्या मनात नेहरू द्वेष किती ठासून भरला आहे याचे कुटील दर्शन घडवणे आहे.

अमित शहा यांनी इतिहासाचा आणि तत्कालीन राष्ट्रीय आणि जागतिक स्थितीचा थोडा जरी अभ्यास केला असता तर अशी बेजबाबदार विधाने त्यांनी केली नसती, असेही छाजेड म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.