Pune : मानवी सांगाड्यावर झाले 17 वर्षानंतर अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज- एका सोळा वर्षीय मुलाचा खून होतो. त्याच्या खून प्रकरणी आरोप असणारे त्याचे मित्र निर्दोष सुटतात पण पुरावा म्हणून पोलिसांनी ठेवलेला मृत तरुणाचा सांगाडा सतरा वर्षांपासून पोलिसांच्या मुद्देमालाच्या खोलीत पडून राहतो. या खोलीची स्वच्छता करताना अचानक हा सांगाडा पोलिसांच्या नजरेत येतो आणि एकच धावपळ उडते. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग कोथरूड पोलीस ठाण्यात घडला. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर या सांगाड्यावर 17 वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोथरूडमधील एमआयटी टेकडीच्या परिसरात 2002 मध्ये निखिल रणपिसे या सोळा वर्षीय मुलाचा खून झाला होता. निखिलच्या मित्रांनी एका नातेवाइकांच्या घरी चोरी केली होती. चोरीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीतून त्याच्या दोन मित्रांनीच त्याचा खून केला होता. खुनाच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. मात्र आरोपींच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्या दोघांची 2006 मध्ये कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

त्यावेळी कोर्टाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे म्हणजेच अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालिन पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यानंतर त्या मृतदेहाचा सांगाडा मुद्देमाल कक्षात तसाच पडून राहिला. पोलीस ठाण्यामधील मुद्देमाल खोल्यांमध्ये सुसूत्रता नसल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी सेंट्रल मुद्देमाल खोली करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कोथरूड पोलीस ठाण्यामधील मुद्देमाल खोली स्वच्छ करताना एका खोक्यामध्ये हा सांगाडा आढळून आला. खोक्यावरील खटल्याच्या क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेतला असता हा सांगाडा निखिल रणपिसे याचा असल्याचे समजले. पण, या सांगड्याची विल्हेवाट लावण्याच्या आदेशाची प्रत पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे कोथरूड पोलिसांनी पुढाकार घेऊन रणपिसेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कोर्टाची प्रक्रिया पार पाडून पुन्हा आदेश मिळवले. त्यानंतर या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.