Pune: शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्येची शंभरी पूर्ण, 99 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) दिवसभरात कोरोनाबाधित 99 नव्या रुग्णांची वाढ झाली तर कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग झालेले 55 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शहरातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने आज शंभरीचा आकडा पार केला. त्यामुळे शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. 

शहरातील आतापर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,818 झाली असून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,283 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या एकूण संख्या 101 झाली आहे.शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 1,283 रुग्णांपैकी  75 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. त्यातील 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दररोज शंभरच्या आसपास नवे रुग्ण मिळत असल्याने पुण्यात भीतीचे वातावरण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या असून त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

शहरातील  कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड कठोर निर्णय घेण्यासाठी कचरत आहेत, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज केला आहे. पुण्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थिती हाताळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे या विरोधी पक्षांच्या वतीने केली आहे. 

दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार कोरोना उपचारांसाठी 250 विलगीकरण बेड आणि ३० अतिदक्षता विभागातील बेडस् उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.