Pune : मराठा समाजाचे चक्री उपोषण महिनाभरासाठी स्थगित

एमपीसी न्यूज- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच इतर 21 मागण्यांसाठी सुरू असलेले चक्री उपोषण प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. महिनाभरात प्रशासनाकडून मागण्यांबाबत अपेक्षित अशी प्रगती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत असलेल्या पाच जिल्ह्यांमधील प्रश्नांसाठी विभागीय आयुक्त आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर, उपायुक्त जयसिंग चव्हाण यांच्यासह सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील सर्व जिल्हाधिकारी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.

या मागण्यांसाठी सुरू होते चक्री उपोषण

1) कोपर्डी घटनेतील हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी

2) मराठा समाजास कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळाले पाहिजे

3) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवा व योग्य ती दुरुस्ती करावी

4) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतमालास हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात

5) प्रकल्पासाठी शेत जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करावे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी

6) कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी – मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र विपरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे

7) मराठा, इतर मागास, खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा

8) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे

9) मराठा समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी स्वायत्त संस्था त्वरित सुरू करण्यात यावे

10) छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरित सुरू करणे. छत्रपती शिवरायांचे गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. राजश्री शाहू महाराजांच्या शाहु मिल कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात यावे.

11) प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी

12) प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेले 500 विद्यार्थ्यांचे वसतिगृह निर्माण करावे त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्या वारस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद व स्थानिक महापालिकांना निर्देश देण्यात यावेत.

13) अल्पभूधारक शेतकरी व रुपये सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती मिळणे बाबत मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार इबीसी योजनेची आर्थिक मर्यादा एक लाखावरून सहा लाख केली आहे. या योजनेचा विस्तार वाढविण्यासाठी त्यातील काही अटींमध्ये दुरुस्ती करणे योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवणे स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या अधिवास प्रमाणपत्र यांसारखे प्रश्न सोडवणे.

14) महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वासियांची भावना लक्षात घेऊन सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने ठोस कृती आराखडा आखावा.

15) मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची महामानवांची बदनामी थांबविणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.