Pune : लग्नाच्या गडबडीचा फायदा घेत व-हाडी मंडळींना लुटणा-या पती-पत्नीला अटक; 37 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – घरातील लग्नाच्या गडबडीचा फायदा घेत गर्दीत मिसळून व-हाडी मंडळींच्या दागिने आणि रोख रकमांवर डल्ला मारणा-या पती-पत्नीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पती-पत्नीकडून 37 लाख 27 हजार 430 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विलास मोहन दगडे (वय 28), जयश्री विलास दगडे (वय 25, दोघे रा. शेलगाव वांगी, वडार गल्ली, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपी पती-पत्नींची नावे आहेत.

  • पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत विविध मंगल कार्यालयांमध्ये व-हाडी मंडळींचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. त्याबाबत पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाला माहिती मिळाली की, व-हाडी मंडळींना लुटणारे पती-पत्नी यवतमधील समृद्धी मंगल कार्यालयात कारमधून येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता दोघांकडे दोन मोबाईल फोन, 4 लाख 12 हजार रुपये रोख रक्कम, चार तोळे सोन्याचे दागिने आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ८ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. जप्त केलेल्या ऐवजाबाबत चौकशी केली असता त्यांनी हा ऐवज सासवड येथील सरस्वती मंगल कार्यालयातून चोरी करून आणल्याचे सांगितले. यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

  • पोलीस कोठडी दरम्यान, दोन्ही आरोपींनी सासवड येथील सरस्वती मंगल कार्यालय, वालचंदनगर येथील केतकेश्वर मंगल कार्यालय, लोणीकाळभोर येथील मधुबन मंगल कार्यालय, काळभोर लॉन्स, राहू येथील देविका मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथील दत्त मंगल कार्यालय, उरुळी देवाची येथील स्वराज मंगल कार्यालय, माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय, ओतूर येथील पार्वती मंगल कार्यालय, वाघोली येथील सोयरीक मंगल कार्यालय, राजगड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, लक्ष्मी मंगल कार्यालय, शिरूर येथील नांगरगाव मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले.

आरोपींनी 17 ठिकाणी चोरी केलेला एकूण 92 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम पाच लाख 27 हजार रुपये, 10 मोबाईल फोन, स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 37 लाख 27 हजार 430 रुपयांचा ऐवज जप्त केला.

  • ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, जीवन राजगुरू, पोलीस कर्मचारी दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमण, राम जगताप, राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, शब्बीर पठाण, श्रीकांत माळी, प्रकाश वाघमारे, खंडू निचित, मोरेश्वर इनामदार, मुकुंद आयाचित, सचिन गायकवाड, राजू मोमीन, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, प्रमोद नवले, गणेश महाडिक, रौफ इनामदार, चंद्रशेखर मगर, विशाल साळुंके, विजय कांचन, गुरु जाधव, डोंगरे, बाळासाहेब खडके, एस. एन. कोरफड, एस पी मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.