Pune : मला Dipressionमध्ये जाणे परवडणारे नाही, असे सांगतेय ही लोकप्रिय अभिनेत्री

एमपीसी न्यूज : ‘संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक कारभार माझ्या खांद्यावर आहे. मी काम केलं नाही तर माझं कुटुंब आर्थिक संकटात सापडेल. माझ्या मुलीची सर्व स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. या पार्श्वभूमीवर डिप्रेशनमध्ये जाणं मला परवडणार नाही’, अशी कबुली लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिने एका मुलाखतीत दिली.

ती पुढे म्हणाली, ‘ही अवस्था काय असते याचा अनुभव मी घेतला आहे. तो अनुभव पुन्हा घेण्याची माझी इच्छा नाही. कितीही निराशा हाती आली तरी मी हार मानत नाही. अपयश प्रत्येकाला येतं. तुमचं प्रत्येक स्वप्नं पूर्ण होईलच असं नाही’.

‘परंतु, अशा परिस्थितीत प्रयत्न करणं हेच आपलं काम आहे. या अनुषंगाने मी विचार करते. त्यामुळे डिप्रेशनसारखा प्रकार माझ्या आसपाससुद्धा फिरकत नाही’, असे श्वेताने मदर्स डेच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावरुन तिची ठाम वृत्तीच दिसून आली आहे.

आजकाल ‘डिप्रेशन’हा खूपच कॉमन शब्द झाला आहे. तसेच चित्रपटांच्या दुनियेत हे नवे नाही. काम मिळालं नाही, ब्रेक अप झालं, नात्यांमध्ये मतभेद निर्माण झाले की कलाकार मंडळी नैराश्यात जातात असं म्हटलं जातं. खरं तर असा दावा दीपिका पदुकोण, संजय दत्त, कतरिना कैफ, इलियाना डिक्रूज यांसारख्या अनेक कलाकारांनी केला आहे.

प्रचंड अपेक्षा असल्याने काही काळासाठी त्यांचं मानसिक स्थैर्य बिघडतं. परंतु, कुठल्याही कारणासाठी नैराश्यात जाणं मला परवडणार नाही, असा आश्चर्यचकित करणारा खुलासा टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने केला आहे.

श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून ती लोकप्रिय झाली होती. या मालिकेत तिने प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तिने ‘झलक दिखला जा’, ‘परवरीश’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ यांसारख्या अनेक सुपरहिट शोमध्ये काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.