Pune: क्रांतीवीर मोहन रानडे यांना मी नमन करतो – बाबासाहेब पुरंदरे

एमपीसी न्यूज – क्रांतीवीर मोहन रानडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात (दि. 22 डिसेंबर 2018) सायंकाळी 6 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील फिरोदिया सभागृहात पार पडला. 50 वर्षांपूर्वी पोर्तुगीज कारागृहातून सुटका झाल्याबद्दल गोवा मुक्ती संग्रामातील थोर सेनानी क्रांतीकारक मोहन रानडे यांचा भव्य नागरी सत्कार हा विवेक व्यासपीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि क्रांतिवीर मोहन रानडे नागरी सत्कार समितीने आयोजित केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने गोवा मुक्ती संग्रामात सामील होऊन धैर्याची भूमिका घेऊन पोर्तुगीजांना सळो की पळो करणारे ज्येष्ठ क्रांतिकारक मोहन रानडे यांचा सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि 21 हजारांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी लायन्स क्लबने देखील 50 हजारांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

मनोगत व्यक्त करताना मोहन रानडे म्हणाले, “माझ्या सत्कारासाठी तुम्ही निवडलेला आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे.कार्यातून झालेली संघटना अधिक मजबूत असते. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील हुकूमशाही पहिली, साधी सभा सुद्धा भरावण्याचे स्वातंत्र्य नव्हते, सिनेमाचं तिकीट छापता येतं नव्हतं,  सरकारच डोकं ठिकाणावर आहे का  हे पुण्यात विचारता येतं होत  पण गोव्यात नव्हतं. लोहियांना हे सहन झालं नाही आणि गोवा मुक्ती संग्रामाची सुरुवात झाली. खरं तर आम्ही केलेल्या कामाला तेव्हा कोणी पाठिंबा द्यायला तयार नव्हते, पण गांधीजींनी पाठिंबा दिला. महात्मा गांधींनी त्यांच्या हरिजन या वर्तमान पत्रात या आंदोलनाचा समावेश केला. तेव्हा गांधी देखील आंदोलन करतील वाटलं पण त्यांनी काही केलं नाही. गोवा मुक्ती संग्रामसाठी आम्ही शस्त्र वापरत होतो, पण ती पोर्तुगीजांविरुद्ध, भारतीयांविरुद्ध नाही. आम्हाला सशस्त्र पकडले तेव्हा आम्ही ती शस्त्रे भारत सरकारविरुद्धच वापरत आहोत अशी समजूत झाली. आम्ही ज्यांच्या विरुद्ध लढत होतो, त्यांच्याच विरुद्ध भारत सरकार देखील लढत होते, पण काही चुकीच्या समजुतीमुळे अशा गोष्टी घडल्या आणि आम्हाला बेड्या ठोकण्यात आल्या.

विचार करण्याची बाब म्हणजे राम मनोहर लोहिया सारखा माणूस तिथला कायदा मोडतो आणि लढा सुरू करतो. आणि त्यांना गोमंतक पाठिंबा देखील देतात, मग भारत सरकारने का एवढा उशीर करावा. 350 हुतात्म्यांनी बलिदान दिले तेव्हा कुठे गोवा मुक्त झाला. ज्या दिवशी गोवा स्वतंत्र झाला तेव्हाच मी पण सुटणार असे जेलरला वाटले होते पण अटक असलेल्या 5000 कैद्यांवर खटले चालवले. आणि त्यानंतर एवढा काळ गेला. माझी सुटका भारत सरकारच्या धोरणांमुळे नाही तर मोहन रानडे मुक्ती समितीमुळे झाली.

मोहनजी रानडे यांच्याविषयी बोलताना बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, “मोहन रानडे हे मूर्तिमंत इतिहास आहेत. 26 मधील साडे तेरा वर्षे त्यांनी शिक्षा भोगली. त्यांना गोवा मुक्तीचे वेड लागले होते. असं वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. चिरंजीव मोहनरावांना मी नमस्कार करतो.” आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या जुन्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “कॅलेंडरची पाने फाडावीत आणि पुन्हा मागे मागे जाऊन जगावे असे ते दिवस होते. तसेच बाबासाहेबांनी इतिहासातील आणि शिवाजी महाराजांचे काही प्रेरक प्रसंग देखील सांगितले.बाबासाहेब पुरंदरे आणि मोहन रानडे यांना ऐकताना प्रेक्षक भारावून गेले होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदीप रावत, सुनील मारणे, श्याम भुरके, शरद कुंटे, महेश पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मोहन रानडे यांच्या सोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. महेश पोहणेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्याम भुरके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.