Pune : ‘दोन’चा प्रभाग झाला तर, भाजपचे अनेक नगरसेवक घरी; बैठकीत चिंता व्यक्त

एमपीसी न्यूज – आगामी पुणे महापालिका निवडणुकीत काँगेस -राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडी सरकार चारचा प्रभाग तोडून दोनचा करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे पडसाद भाजपच्या झालेल्या बैठकीतही उमटले.

2017 च्या महापालिका निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट, चारचा प्रभाग, काँगेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर याचा भाजपला फायदा झाला. तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. आता हे नगरसेवक सांभाळणे भाजपला आव्हान आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याची कुजबुज आहे.

शिवसेनेने तर आमचा मुख्यमंत्री झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत किमान 50 नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास नगरसेवक विशाल धनवडे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून अजित पावरच सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती समजते. पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणी देण्याला प्रथम प्राधान्य असेल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात येत आहे. काँगेसलाही सत्तेचा लाभ होण्याची आशा आहे.

सभागृह नेतेपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद दोन्ही कसबा मतदारसंघांत दिल्याने उपनगरांतील नगरसेवक नाराज आहेत. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.