Pune : पोलीस आयुक्तालयातच झालंय अनधिकृत बांधकाम ?

एमपीसी न्यूज- कायद्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करून दंड आकारणारे पोलीसच ज्यावेळी नियमबाह्य कामे करू लागतात त्याला काय म्हणावे ? असाच एक प्रकार पुण्यात चक्क पोलीस आयुक्त कार्यालयातच झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य इमारतीवरील गच्चीवर पोलिसांनी एक बांधकाम केलं असून त्या ठिकाणी प्रशस्त दोन हॉल तयार करण्यात आले आहेत. परंतु या बांधकामाला पुणे महापालिकेची कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाले आहे.

शहरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला पुणे महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विनापरवाना केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात येते. परंतु पुणे पोलिसांच्या या अनधिकृत बांधकाम याला अपवाद असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी 19 ऑक्टोबर 2019 रोजी महापालिकेला पत्र पाठवून बांधकामासाठी परवनगी मागितली आहे. मात्र, आर्कीटेक्ट मार्फत विहीत नमुन्यामध्ये वाढीव बाधंकामासाठीचे नकाशे सादर करावेत. त्यानंतरच त्यांना मंजुरी देता येईल असे महापालिकेने या पत्रात स्पष्ट केले आहे. असे असतानाही पोलिसांनी त्यावर सदरील बांधकामाबाबतचे नकाशे सादर केले नाहीत व पत्रव्यवहार ना करता थेट बांधकाम पूर्ण केले.

याबाबत पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पोलीस आयुक्ताकडुन बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आला आहे. परंतु अद्याप यासाठी परवानगी देण्यात आली नाही असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या बांधकामाबाबत पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. आता या अनधिकृत बांधकामावर महापालिका काय कारवाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.