Pune : आंबील ओढ्यामधील अतिक्रमणे तातडीने काढवीत; खासदार वंदना चव्हाण यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – आंबील ओढ्यात झालेली सर्व अतिक्रमणे तातडीने काढून पडलेल्या सर्व सीमाभिंती आणि सुरक्षभिंती ओढ्याची पूररेषा कायम करून तातडीने बांधण्यात याव्यात, अशी मागणी राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.

पुणे शहरात बुधवारी (दि. 25 सप्टेंबर 2019) रोजी आलेल्या पुरामुळे कात्रज तलावापासून उगम पावणाऱ्या आंबील ओढा व त्याच्या आजूबाजूच्या सर्व भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबील ओढ्याचा प्रवाह अनेक ठिकाणी वळविण्यात आला आहे. ओढ्यालगत असणाऱ्या अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ओढ्यालागत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, वसाहती, सोसायटी, बंगले, वसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पावसात पूरपरिस्थिती निर्माण होत असून नागरिक भयभीत असल्याचे वंदना चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नितीन कदम यावेळी उपस्थित होते.

टांगेवले कॉलनी आणि नाल्यालगत असलेल्या वसाहती व झोपडपट्टीत राहणाऱ्या पुरबाधित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, फक्त नुकसान भरपाईसाठी नव्हे तर नागरिकांनी पुरात गमावलेली कागदपत्रे मिळण्यासाठी बाधित घरांचे पंचनामे त्वरित व्हावे. नाल्यावर असलेल्या पूल किंवा कलवरटची आवश्यक तिथे उंची किंवा रुंदी गरजेनुसार वाढविण्यात यावी. नाल्याच्या प्रवाहात येणारे अतिक्रमणे व बांधकामे त्वरित काढण्यात यावी. ओढ्याच्या आजूबाजूला सर्व छोट्या मोठ्या ड्रेनेज लाईन व नाल्यांची त्वरित साफसफाई करण्यात यावी, आशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.