Pune : नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ‘अभय योजना’ राबवा; नगरसेवक दीपक मानकर, भैय्यासाहेब जाधव यांचा स्थायी समितीला प्रस्ताव

एमपीसी न्यूज – नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेने निवासी मिळकत काराबाबत ‘अभय योजना’ राबवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर आणि भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीला दिला. मंगळवारी समितीच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेचा मिळकत कर वेळेत न भरल्यास थकबाकीवर प्रतिमहा 2 टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे एका वर्षात 24 टक्के इतका दंड आकारला जातो. ही रक्कम जाचक आहे. पुणे महापालिकेने यापूर्वी मिळकत करासाठी अभय योजना राबवून दंडाच्या रकमेत सूट दिली होती. त्यावेळी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

मिळकत कराची पावती प्राप्त न झाल्याने अनेक नागरिकांकडून हा कर वेळेत भरला जात नाही. त्यामुळे दंडाची जाचक रक्कम वाढत जाते. सामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य होत नाही. पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने अभय योजना राबवावी, असे दीपक मानकर आणि भैय्यासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.