Pune : कोरोना प्रतिबंधासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा : राजेश टोपे

Implement 'Mumbai pattern' in districts including Pune city for corona corona prevention - Rajesh Tope

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज, शुक्रवारी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालायात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतात ते बोलत होते. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे.

मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतली आहेत. त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा.

त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस्, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात.जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल.

कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री टोपे यांनी केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावेत, अशा सूचनाही दिल्या.

स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मिडीया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींना विचारात घेवून जनजागृती करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून ‘यशकथा’ तयार कराव्‍यात. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ ॲण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्‍या दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही आरोग्य मंत्री टोपे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.