Pune : दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले- खासदार नारायण राणे

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद ‘ पुण्यभूषण ‘ दिवाळी अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे, असे उद्गार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काढले. ‘तिरकस पुणेकरांनी सरळ पुणेकरांवर काढलेल्या दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या 8 व्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि 19) सायंकाळी झाले. यावेळी नारायण राणे बोलत होते.

खासदार नारायण राणे, सहकारी बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, अमेरिकास्थित पुणेकर डॉ. सुरेश तलाठी, ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले.

नारायण राणे म्हणाले, ‘राजकारणी माणसाला समोर माणसे लागतात. आज माणसे पावसामुळे व्यासपीठावर आहेत. पण, कोणी घरी गेले नाही. पुण्यात ‘पुण्यभूषण ‘ला इतिहास आहे. दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद हा अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे. त्याच त्याच गोष्टींकडे पुणेकर ढुंकून पाहत नाही, म्हणून डॉ. सतीश देसाई यांनी सतत नवनव्या गोष्टी सुरू केल्या. पुण्यभूषण अंकाने पुणेकरांच्या चांगल्या गोष्टी पुढे आणल्या. आणि स्वतःला चांगले म्हटलेले पुणेकरांना आवडते. असे नारायण राणे म्हणाले.

मुकुंद टांकसाळे यांनी पुणेरी वातावरणाचे नर्मविनोदी शैलीत किस्से सांगितले तर विद्याधर अनासकर यांनी आयुष्यातील यशाचे श्रेय आईला दिले. यावेळी युवराज शहा यांनी घेतलेल्या नारायण राणे यांच्या मुलाखतीतुन राजकीय फटकेबाजी उपस्थितांना अनुभवता आली.

‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमापूर्वी विठ्ठल काटे, सुमन काटे, मकरंद टिल्लू यांनी हास्ययोग सादर केले. अप्पा कुलकर्णी यांनी शीळवादन केले.

पुण्यभूषण ‘ च्या या वर्षीच्या अंकाचे पहिले पान बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर यांना समर्पित करण्यात आले आहे. पाच पुणेकरांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या योगदानाचा उल्लेख करुन ‘सन्मान’ पानावर स्थान देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.