Pune : ‘युज्ड कार डीलर्स असोसिएशन’चा शुक्रवारी उद्घाटन सोहळा; पोलीस आयुक्त यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय छुपे खर्च घेता व्यवहार व्हावेत आणि वापरलेल्या वाहनांच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी. तसेच विक्रेत्यांना मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने युज्ड कार डीलर्स असोसिएशन पुणेची (युसीडीएपी) स्थापना करण्यात आली आहे.

या असोसिएशनचे उद्घाटन आणि ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार सोहळा येत्या शुक्रवारी (२७ सप्टेंबर ) सायंकाळी ७.०० वाजता रेसिडेन्सी क्लब येथे होणार आहे.  यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व व्हेन्टेज कार संग्रहालयाचे सुभाष सणस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘युसीडीएपी’चे अध्यक्ष विनोद अहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी उपाध्यक्ष सचिन साकोरे, सचिव निलेश भागवत, खजिनदार आशिष खंडेलवाल, राजेश ढवळे, मोहसीन सय्यद, प्रकाश उदेशी, अतुल जैन आदी उपस्थित होते.

यावेळी विनोद अहिर म्हणाले, असोसिएशनच्या माध्यमातून डिलर्सना ‘ऑटोकट्टा’ हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्राहकांशी थेट संपर्क करून चांगला आणि पारदर्शी व्यवहार करणे शक्य होणार आहे. ग्राहकांना आपल्या गाडयांना योग्य किमंत मिळेल. आज अनेक ऑनलाईन पोर्टल्स आहेत. मात्र, त्यात अनेकदा फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात येते.

आपल्या देशात आजही स्वतःच्या गाडीचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. त्यांना कमी व्याजदरावर अर्थसहाय्य मिळाले, तर या उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. भविष्यात असोसिएशनमार्फत वापरलेल्या गाड्यांचे मेळावे भरविणे, एका छताखाली वेगवेगळ्या गाड्या आणि डीलर्स आणणे यासह रस्ते सुरक्षा विषयक जागृतीपर कार्यक्रम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.