Pune : शहरातील झोपडपट्ट्यात कोरोना चाचण्या वाढवा : संजय मोरे

Increase corona tests in urban slums: Sanjay More

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. झोपडपट्ट्यात उपाययोजनांचा अभाव आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यातही कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. खासदार अनिल देसाई या चर्चेत सहभागी झाले होते.

पुण्यातील झोपडपट्टी भागांमध्ये अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. या स्वछतागृहांची सातत्याने स्वछता करण्यात यावी, पुणे महापालिकेने गरजू नागरिकांना शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी  संजय मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली.

तसेच  बालेवाडी क्रीडा संकुल प्रमाणेच नेहरू स्टेडियमही कोरोना उपचारासाठी ताब्यात घ्यावे, शहरातील सर्व रुग्णवाहिकांचे कोरोनाबधितांसाठी व इतर आजारांसाठी वर्गीकरण करावे, रुग्णवाहिकांवर सर्व वैद्यकीय किट उपलब्ध करून द्याव्यात, अशा अनेक मागण्या संजय मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.

पिंपरी – चिंचवड शहराचा समावेश ‘नॉन रेड झोन’ वर्गवारीत केल्याने गेल्या 3 दिवसांत कोरोनाचे 125 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील निर्बंध शिथिल झाल्याने कोरोना वाढत आहे. ‘नॉन रेड झोन’ नियमावलीची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.

तर, पिंपरी – चिंचवड महापालिकेने क्वारंटाईन ठिकाणे वाढविण्याची गरज असल्याचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.