Pune : महापालिकेच्या ‘फ्ल्यू सेंटर’च्या संख्येत वाढ; सील केलेल्या भागात 11 मोबाईल व्हॅनव्दारे तपासणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वतीने कोविड-19 ची ’74 फ्ल्यू सेंटर’ सुरु करण्यात आली असून सील करण्यात आलेल्या भागात 11 मोबाईल व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येत आहे. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 35 फ्ल्यू सेंटर सुरु करण्यात आली असून सील करण्यात आलेल्या भागात 4 मोबाईल व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येत आहे. फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

‘फ्ल्यू’सारखी (सर्दी, खोकला, ताप) लक्षणे आढळून आल्यानंतर रुग्ण स्वत: उपचार करवून घेत आहेत किंवा स्थानिक खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 10 दिवसानंतर या रुग्णामध्ये आजार गंभीर किंवा जीवघेणा होत असल्याचे आढळून येत आहे.

यासाठी ‘फ्ल्यू’सारखी लक्षणे दिसून आल्यास विशेषत: ज्येष्ठ नागरिक व ज्या नागरिकांना रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, ह्दयरोग यांसारखे आजार असणाऱ्या नागरीकांना ‘फ्ल्यू’सारखी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये दाखवून घ्यावे.

जिल्हयातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही रुग्णास ‘फ्ल्यू’सारखी लक्षणे दिसल्यास पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध आदी ठिकाणी पाठवावे.

अशा रुग्णांना वेळेवर पाठवून दिल्यास त्यांची आवश्यकतेनुसार कोविड -19 साठी नमुने घेऊन निष्कर्षानुसार औषधोपचार करता येतील, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.