Pune : शहरातील स्वॅब तपासणी केंद्रांची संख्या वाढवा : महापौर

राज्य सरकारकडे पत्राद्वारे मागणी ; पालकमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरूनही चर्चा

एमपीसी न्यूज – शहरात गेल्या काही दिवसांत आणि काही विशिष्ट भागात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीत सॅम्पल गोळा करुन त्याचा अहवाल तातडीने प्राप्त होणे आवश्यक आहे. जेणेकरून विलगीकरणाची प्रक्रिया वेगात होऊन उपचारांचे नियोजन सुकर होईल. मात्र, पुण्यात आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये एनआयव्हीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम सुरु असल्याची माहिती आहे. पर्यायाने या सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुण्यात आणखी एक स्वॅब तपासणी लॅब वाढवा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

स्वॅब तपासणी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत महापौर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी महापौर मोहोळ यांचा फोनवरही संपर्क साधला आहे.

स्वॅब नमुने तपासणी प्रलंबित असल्याने पाठवलेल्या सॅम्पलचा अहवाल तीन दिवसांनी मिळत आहे. परिणामी क्वारंटाईन सेंटरमधून संसर्गाचा धोका अधिक बळावला आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘ गेल्या काही दिवसात स्वॅब कलेक्शन वाढवण्यात आले असले तरी त्यावर पुढील प्रक्रिया होण्याचे प्रमाण घटलेले आहे. त्यामुळे ‘रिझल्ट अव्हेटेड’ असलेल्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे अशा नागरिकांमुळे संक्रमण झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आताच्या घडीला ही अत्यंत गंभीर बाब वाटते. तर सॅम्पल प्रलंबित राहिल्याने दुसरीकडे नवे सॅम्पल घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणारे नागरिक समाजात वावरण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या संक्रमणाचा धोका मोठा असू शकतो.

‘लॉकडाऊन हा कोरोनावरील कायमचा उपाय नाही, आपण सर्व हे जाणतोच. मात्र टेस्टिंगची संख्या वेगाने वाढली की प्रादुर्भाव नियंत्रणात आणि वेळेत आटोक्यात आणण्यासाठी मदतच होईल.

त्यामुळे पुणे शहराची टेस्टिंग क्षमता तातडीने वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना नियंत्रणाची प्रक्रिया पुणे शहरात आणखी किती दिवस चालेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे तातडीने आपण ही मागणी राज्य सरकारने मान्य करावी, असेही महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.