Pune : एका रात्रीत वाढले 127 कोरोनाबाधित ; जिल्ह्यात 1722 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करूनही रोज 100 ते 125 कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. बुधवारी रात्रीत तब्बल 127 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत 1722 रुग्ण झाले असून, 86 नागरिकांचा बळी गेला आहे.

पुण्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पुण्यात 9 दिवसांतच कोरोनाचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागातील व्यापारी पेठा, दाटवस्ती, झोपडपट्ट्यामध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. लॉकडाऊन करूनही रुग्ण कमी होत नसल्याचे प्रशासनसमोर रुग्ण वाढ रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

झोपडपट्टी भागात कॉमन टॉयलेट – बाथरूमचा वापर होत असल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन सुरू आहे. भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, येरवडा – कळस – धानोरी, बिबवेवाडी, मुंढवा, हडपसर, नगररोड, शिवाजीनगर – घोलेरोड भागांत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे.

पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड, बारामतीमध्ये पाहणी केली. जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष व हॉस्पिटल्सची पाहणी केली. या दरम्यान काही सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे या सूचना अमलात आल्यास रुग्ण वाढीचा वेग कमी होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.