Pune : कोरोना हॉटस्पॉटमधील नागरिकांच्या स्वॅब चाचणीसाठी स्वतंत्र नियोजन : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील मध्यवर्ती भागांतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या  5 वॉर्डात नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी म्हणजेच कोरोना चाचणीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरिता पुणे मनपाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शहराच्या विविध भागांत आयसोलेशन सेंटर्स व फ्लू क्लिनिक सुरू केलेले आहेत.

तथापि, वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जलद नियंत्रणाच्या दृष्टीने शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत तपासणी केंद्रे बुधवार (दि. 6 मे) पासून संबंधित मनपा शाळेतून सुरू करण्यात येणार आहेत.

यामध्ये येरवडा कळस धानोरी, कै. ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर घोले रस्ता, भवानी पेठ, कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मनपा शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी वेळी नागरिकांचे फॉर्म भरण्यात येईल. यामध्ये नागरिकांची माहिती भरण्यात येईल. नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक नोंदविण्यात येणार आहे.

रुग्णाचा नमुना घेतल्यानंतर स्वीकार केंद्रावरील प्रमुख याच्या नोंदी ठेवणार आहेत. नंतर ती माहिती डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे पाठविली जाणार आहे. मनपा शाळेत घेण्यात आलेल्या घशातील द्रावाच्या नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल.

संबंधित रुगणाची माहिती ई- मेलद्वारे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाला त्याच दिवशी कळविण्यात येणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.