Pune : भारतीय लष्कर- रशिया यांच्या दरम्यानचा संयुक्त सराव संपन्न

एमपीसी न्यूज – भारतीय लष्कर आणि रशिया यांच्या दरम्यानचा संयुक्त सराव नुकताच लोहगाव येथे पार पडला. या सरावांतर्गत दोन्ही देशाच्या लष्करांनी संयुक्तपणे हवाई, जल आणि जलयुद्धातील विविध मोहिमांचा सराव केला. हवाई सराव शिबिर पुणे, गोवा, ग्वाल्हेर येथे, लष्कराचे शिबिर बाबिना येथे आणि नौदलासाठी गोवा येथे हा संयुक्त सराव पार पडला.
दोन्ही देशांतील सैन्याची युद्धकौशल्ये वाढविणे व युद्धसदृश परिस्थितील एकमेकांदरम्यानचा सुसंवाद वाढविणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या विविध कामगिऱ्यांदरम्यान ऱशियन फेडरेशन एअर फोर्स बरोबर सहकार्य वाढविण्यासाठी हा सराव करण्यात आला.
या सरावादरम्यान भारतीय हवाई दलाची सू-३०, एमकेआय, जॅग्वार, मिराज-२०००, संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस, आयएल-७६, एईडब्लू अन्ड सी, एएन-३२, एमआय-१७ व्ही ५, भारतीय बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा, आकाश तसेच हवाई सुरक्षेसाठी वापरली जाणारी रडार्स आदी यंत्रणांचा वापर करण्यात आला.
रशियन हवाई दलाच्या विविध विभागांतील सुमारे ८० कर्मचाऱ्यांनी विशिष्ट कामांबाबतचे आपले विविध अनुभव भारतीय सैन्यातील कर्मचाऱ्यांना सांगितले. या सरावातील अनुभवांचे त्यांनी आदानप्रदान तर केलेच तथापि, यापुढे जाऊनही सामाजिक, सांस्कृतिक आणि आपली क्रीडाकौशल्येही विविध कार्यक्रमांद्वारे अजमावून पाहिली.
एअर आफिसर कमांडिंग, लोहगाव हवाई तळ, पुणे, एअर कमोडोर राहुल भसीन यांनी या संयुक्त शिबिरार्थींचे अभिनंदन केले.