Pune : भारत-दक्षिण कोरियातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत – चांग जे बोक

एमपीसी न्यूज – भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील (Pune)परस्पर मैत्रीपूर्ण संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत आहेत. उद्योग, शिक्षण, संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात आदानप्रदान झालेले आहे. दोन्ही देशांमधील या नात्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात आहे. पुढील काळात उभय देशांतील परस्पर संबंध सर्वच आघाड्यांवर अधिक वृद्धिंगत व्हावेत,” असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे. बोक यांनी मंगळवारी केले.

 

बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरमध्ये (Pune)बहुप्रतीक्षित किंग सेजोंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन चांग जे बोक यांच्या हस्ते झाले. प्रसंगी दक्षिण कोरियाचे मुंबईतील कॉन्सुल जनरल किंम यंग ओग, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक, किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या केंद्र संचालिका डॉ. इउन्जु लिम, युथबिल्ड फाउंडेशनचे चेअरमन व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. प्रदीप बावडेकर, डॉ. आदित्य बावडेकर यांच्यासह डिप्लोमॅट्स, पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील कोरियन कंपन्यांचे संचालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Pune: कोशकार य. रा. दाते यांच्या घरावर नीलफलक
चांग जे बोक म्हणाले, “आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये गेल्या 50 वर्षांपासून मैत्रीचे व भागीदारीचे संबंध आहेत. भारतीय संस्कृती, आदरातिथ्य, येथील खाद्यपदार्थ, व्यवसाय व शिक्षणासाठी अनुकूल वातावरण यामुळे कोरियातील अनेक कंपन्याना भारताला प्राधान्य देतात. 28 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल या दोन्ही देशांत होत आहे. भविष्यात भारतामध्ये कोरियन शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार आहे.”

“भारताने कोरोनाच्या संकटकाळात दिलेला लढा आणि हाताळलेली परिस्थिती कौतुकास्पद होती. ‘जी-20’चे यशस्वीपणे अध्यक्षपद भूषवताना भारताने जगाला भारतीय संस्कृती, विकासाचे व क्षमतेचे दर्शन घडवले आहे. यातून संपूर्ण जगाला एक सकारात्मक संदेश गेला आहे. आगामी काळात भारत जगातील प्रमुख देशांपैकी एक असेल. व्यक्तिशः मला भारतीय संगीत, गाणी, चित्रपट, जिलेबी, गुलाबजामून आदी पदार्थ फार आवडतात,” असेही चांग जे बोक यांनी नमूद केले. ऑस्कर विजेत्या ‘नाटु नाटु’ या गाण्याची भुरळ बोक यांनाही पडली असून, त्यावर त्यांनी नृत्य केलेला व्हिडीओ यावेळी दाखविण्यात आला.

 

किम यंग ओग यांनीही या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी, नोकरदारांना कोरियन भाषा, संस्कृती आत्मसात करण्यासाठी मदत होईल. आमच्या कार्यक्षेत्रात ही इन्स्टिट्यूट येत असून, याला सर्वोत्तम बनवण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आम्ही करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कोरियन आणि भारतीय नृत्य व गायन संस्कृतीच्या एकत्रित सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही देशांचे राष्ट्रगान, गणेशवंदना, कथ्थक नृत्य, गायन, संगीताच्या आधुनिक व पारंपरिक नृत्य-गायन शैलीचा अनुभव उपस्थितांनी घेतला. तसेच चांग जे बोक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

डॉ. प्रदीप बावडेकर, संजीब घटक यांनीही आपल्या मनोगतात दोन्ही देशांतील संबंध आणि इंडो-कोरियन सेंटर देत असलेले योगदान याविषयी माहिती सांगितली. डॉ. इउन्जु लिमयांनी स्वागत प्रास्ताविकात किंग सेजोंग फाउंडेशन व पुण्यात स्थापन झालेल्या किंग सेजोंग इन्स्टिट्यूटविषयी माहिती दिली. डॉ. इउन्जु लिम यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

किंग सेजोंग इन्स्टिट्यूटविषयी :
भारतीय आणि कोरियन लोकांना एका व्यासपीठावर आणून त्यांना आदानप्रदानाची संधी देण्याच्या उद्देशाने स्थापित युथबिल्ड फाउंडेशन येथे इंडो कोरियन सेंटरची (आयकेसी) स्थापना झाली आहे. कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत जुलै 2023 मध्ये या केंद्राला किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे सुरु करण्यास मान्यता मिळाली.

या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरियन भाषेचे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. तसेच कॉर्पोरेट नोकरदारांसाठी कोरियन भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण पुरविण्यात येणार आहे. मूळ कोरियन शिक्षकांकडून हे वर्ग आयोजित केले जातील. यामध्ये कोरियन भाषा आणि संस्कृतीच्या प्रशिक्षणासाठी सर्व आधुनिक सुविधा असतील. ज्यामध्ये स्मार्ट कलासरूम, मनोरंजन क्षेत्र, साहाय्य कक्ष, ग्रंथालय, कॅफेटेरिया आदींचा समावेश आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.