Pune : समूहनृत्याने एकल नृत्य हरविण्याचा धोका- मनीषा साठे

'लक्ष्य 'नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- एकल नृत्य हा शास्त्रीय नृत्याचा आत्मा असतो, पण आज समूह नृत्य मोठ्या प्रमाणात सादर होते, एकल नृत्य पद्धत हरवत चालली आहे, ती वाढीस लागावी यासाठीही संस्था प्रयत्न करीत असून आजचा कार्यक्रम त्याचेच रूप आहे,एकल नृत्यातूनच खर्या कलेचा आणि कलाकाराचा कस लागतो, असे मत ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठे यांनी व्यक्त केले. निमित्त होते भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लक्ष्य’ या कथक भरत नाट्यम आणि ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे.

यावेळी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा नंदकुमार काकिर्डे ,शा नृ सं संस्थेच्या अध्यक्षा शमाताई भाटे, उपाध्यक्ष सुचेता चाफेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती साठे पुढे म्हणाल्या, “जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे ९ शास्त्रीय नृत्य प्रकार अस्तित्वात आहेत, ज्यांचे नेतृत्व पुण्यातून होत आहे, म्हणून सर्व नृत्यांचे संवर्धन, प्रसार, प्रचार करण्यासाठी ही संस्था कार्य करीत असून नृत्यावरील व्याख्यान, कार्यशाला, प्रत्यक्ष सादरीकरण याद्वारे विविध उपक्रम यापुढे राबविण्याचा संस्थेचा मानस आहे”

‘लक्ष्य’ या कार्यक्रमात लीना केतकर यांनी कथक नृत्य, रसिका गुमास्ते यांनी ओडिसी तर अरूंधती पटवर्धन यांनी भरतनाट्यम नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. केतकर , गुमास्ते आणि पटवर्धन यांच्या एकल नृत्यानंतर तिघींनी मिळून “स्त्री शक्ती” या संकल्पनेवर समूह फ्यूजन नृत्यही सादर केले.
तिघींचे एकल नृत्य व समूह नृत्य हे “शिव शक्ति” या थिमवर अधारित होते. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ नृत्यांगना, ओडिसी गुरू श्री बेहरा यांच्या कन्या आणि शिष्या कविता द्विवेदी (दिल्ली ) यांच्या ओडिसी नृत्याच्या एकल सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा नंदकुमार काकिर्डे यांनी केले तर निवेदन नयनतारा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.