Pune : तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध – पं. सुरेश तळवलकर  

एमपीसी न्यूज – तबल्याने भारतीय संगीताला समृद्ध केले आहे, मात्र तबलावाद्काने गिमिकच्या मागे न लागता, मूळ संगीताशी प्रामाणिक राहायला हवे, असे मत तालयोगी पंडीत सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’तील ‘अंतरंग’, या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संगीत समीक्षक केशव परांजपे यांनी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुलाखत घेतली, त्यावेळी तळवलकर बोलत होते. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी उपस्थित होते.

पंडित तळवलकर म्हणाले, “तबल्याची उत्पत्ती भारतातच साडेतीनशे वर्षांपूर्वी झाली. शाई लावलेले वाद्य भारतातच आहे. पखावजाचे बोल तबल्याने घेतले. तबल्याने अनेक फॉर्म निर्माण केले. तबल्याला अनेक भाषेने आणि भावांनी समृद्ध केले आहे. तबला ख्याल, धृपद धमार, नृत्य अशा सगळ्याची साथ करू शकते आणि ते सोलोही वाजते. त्यामुळे तबल्याने संगीताला समृध्द केले आहे.”

पं. तळवळकर पुढे म्हणाले, की तबलावादकाला ज्या फॉर्मसाठी वाजवतोय त्याच्याशी प्रामाणिक राहायला हवे. ज्यावेळी साथ करीत आहोत, त्यावेळी तसेच वाजवले पाहिजे. सोलो सारखे वाजवून चालणार नाही. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी काही गिमिक करू नये. ते म्हणाले, “जे सांगता येत नाही, ती अनुभूती आणि अनेक अनुभूती आल्या, की त्याचे ज्ञान होते. त्यासाठी साधना करायला लागते. आता तंत्र वाढत चालल्याने गिमिक वाढत आहे. त्यामुळे सगळे अविष्कार लुप्त व्हायला लागले आहेत. मेगा इव्हेन्टमध्ये असे गिमिक होतात, ते टाळण्यासाठी बैठकीचा माहोल हवा आणि कलाकाराने मूळ संगीताला सोडू नये. टाळ्यांसाठी काही करू नये.”

पखवाज हे घरचेच वाद्य असूनही, तबला हे वाद्य पुढचे आहे, असे वाटल्याने, त्यात पुढे काम केले आणि अनेक बदल केल्याचे सांगून, तळवळकर यांनी आपल्या अनेक शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या आणि उस्ताद अल्लारखाँ कसे काळाच्या पुढे बघणारे होते, हेही त्यांनी सांगितले.

संगीत म्हणजे काय, हे सांगताना तळवळकर म्हणाले, “संगीत ही स्थुलातून सुक्ष्माकडे जाण्याची क्रिया आहे. ताल ही बौद्धिक क्रिया आहे. तालाचे आवर्तन शरीरापासून सुरू होते, मेंदूत जाते, अंतर्मनात जाते आणि नंतर त्याचा छंद होतो. रागाची धूनमय अवस्था होत नाही तोपर्यंत राग सिद्ध होत नाही. तालाचा छंद होणे आणि रागाची धून होणे, म्हणजे संगीत सुरू होते. द्रुपद हे तालाशी संबंधीत असून, ख्याल ही ठेका प्रधान गायकी आहे. मुखडा हा भारतीय संगीताचा प्राण आहे. सम हा सर्वोच्च बिंदू आहे.”

यावेळी ‘षड्ज’, या कार्यक्रमामध्ये बिजॉय चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला, गिरीजा देवी यांच्यावरील माहितीपट देखील दाखविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.