Pimpri : पश्चिम महाराष्ट्रातील काही उद्योग पुन्हा सुरु ; लाॅकडाऊनचे नियम बंधनकारक

एमपीसी न्यूज –  पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील 27 मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. तर औरंगाबादमधील बजाज कंपनीसह इतर 50 कंपन्यांमधील काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. पुणे  जिल्ह्यात कुरकुंभ,  इंदापूर,  भिगवण,  जेजुरी पाठोपाठ वालचंदनगर इंडस्ट्रीही गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. 

देशात व राज्यात 20 एप्रिल पासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लाॅकडाऊनचे नियम शिथिल करून उद्योगधंद्यांना सुरू करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमधील 27 मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. कामगारांची सुरक्षा व लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.

वालचंदनगर इंडस्ट्रीज, दौंड-पाटस रस्त्यावरील उद्योगांना गुरुवारी परवानगी दिली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात सिमेंटच्या तीन, कपड्यांना लागणाऱ्या धाग्याच्या तीन कारखान्यांना कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच सांगलीमध्ये किर्लोस्कर समूहाचे काही उद्योग आणि साताऱ्यात कमिन्स इंडिया काही युनिट सुरू करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून हे उद्योग सुरू होतील, अशी माहिती पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली.

या पाच जिल्ह्यांमधील औषधं आणि अन्न प्रक्रिया करणारे 1450 उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीतच टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. ज्यामधे 53 हजार कामगार काम करत आहेत. आता त्यामध्ये सत्तावीस मोठ्या उद्योगांची भर पडली आहे. पुणे महानगर क्षेत्रात (पीएमआरडीए) अत्यावश्यक सेवा वगळता 980 उद्योगांना उद्योग विभागाने 20 एप्रिलपासून परवानगी दिली होती. परंतु, राज्य सरकारने ही शिथिलता 21 एप्रिल रोजी रद्द केली आहे. त्यामुळे तेथे अन्य उद्योग सुरू होऊ शकलेले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.