Pune : होम क्वारंटाईन प्रक्रियेची माहिती खासगी डॉक्टरांना द्या : डॉ. अविनाश भोंडवे

Inform private doctors about home quarantine process: Dr. Avinash Bhondwe : खाजगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांची नोंद कशी करावी.

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर खाजगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांवर उपचार करू नयेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता खाजगी डॉक्टरांना उपचारात सहभागी करून घेतले आहे. कोरोना रुग्णांची नोंद कशी करावी, त्यांचे होम क्वारंटाईन कसे करावे, याबाबत पालिका प्रशासनाने सर्व डॉक्टरांना माहिती द्यावी, अशी मागणी आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केली.

राजीव गांधी स्मारक समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांची भेट घेऊन समिती तर्फे झालेल्या “झूम-वेबीनार कोन्फरन्स परिषदेतील माहिती देऊन आवश्यक त्या सहकार्याबाबत चर्चा केली. त्यावेळी डॉ. भोंडवे बोलत होते.

राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी आरोग्य प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. जयश्री तोडकर, आयएमए पुणे अध्यक्षा डॉ. आरती निमकर, डॉ. राजन संचेती, क्रेडाई महाराष्ट्र लीगल सेलचे आय. पी. इनामदार, जेष्ठ पत्रकार व समिती सदस्य दीपक जाधव सहभागी झाले होते.

पुणे शहरात कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर-बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधील बेड उपलब्धतेच्या डॅशबोर्डमधील अडचणींमुळे त्या–त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्याची तयारी  समितीच्यावतीने   दाखविण्यात आली.

रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती स्वयंसेवक ठेवतील व आवश्यकते प्रमाणे वितरीत करतील. या स्वयंसेवकांना महापालिका प्रशासनाने ओळखपत्र द्यावे.

तसेच त्यांनी कसे काम करावे, याबाबत प्रशिक्षण द्यावे, असे समितीच्या वतीने गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.तसेच स्वयंसेवकांना प्रशिक्षण देवून घरोघरी पाठवावे.

डॉ. संजीव वावरे यांनी महापालिकडून बेड वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. नितीन बोलोलीकर यांनी करण्यात आलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.