Pune : कचऱ्याच्या डब्यात सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

एमपीसी न्यूज- कचरा साफ करीत असताना एका कचरावेचक महिलेला कचऱ्याच्या डब्यात स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एक दिवसाच्या या नवजात अर्भकावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्याच्या विश्रांतवाडी भागात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बुधवारी (दि. 18) उघडकीस आली. याबद्दलची सविस्तर माहिती अशी की,
कचरावेचक महिला लक्ष्मी ढेंबरे या विश्रांतवाडी परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम करतात. बुधवारी सकाळी त्या स्नेहगंध अपार्टमेंट या इमारतीतील कचरा गोळा करत होत्या. यावेळी त्यांना एका कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. त्यांनी डबा काढून पाहिले असता एका स्कार्फमध्ये गुंडाळलेले एक स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले.

लक्ष्मी ढेंबरे यांनी त्वरित ही माहिती इतर सहकाऱ्यांना तसेच महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक व मुकादम यांना दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आळंदी रोड चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी येऊन या अर्भकाला ताब्यात घेतले आणि उपचाराकरिता ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.