Pune News: मिळकतकर धारकांच्या विमा कवचास अडचण नाही- रुबल अग्रवाल

मिळकत कराचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रुपयांचे विमा कवच आणि कुटुंबीयांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचा नियमित आणि वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांना लागू केलेल्या विमा कवचास कुठलीही अडचण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

मागील वर्षी विम्याचे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती सरकारी विमा कंपनी आहे. या कंपनीने दि. २७ मे पासून मुदत वाढ देण्याचे मान्य केले आहे.

तांत्रिक कारणास्तव नवीन निविदा रद्द झाली असली तरी, मागीलवर्षी ज्या कंपनीला विम्याचे काम देण्यात आले होते, त्याच कंपनीला पुढील कंपनीची नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मिळकत कराचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रुपयांचे विमा कवच आणि कुटुंबीयांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या.

पण, दि. २७ मे रोजी पूर्वीच्या विमा कंपनीची मुदत संपल्याने नवीन विमा कंपनी नियुक्त न झाल्याने मिळकतधारकांना विमा लाभ मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती.

पंडित दीनदयाळ विमा योजनेसाठी काढलेल्या निविदेला दोन विमा कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एक कंपनी अपात्र ठरली आहे. तर, दुसऱ्या कंपनीचे ब पाकीट उघडलेले नाही. यात तांत्रिक कारणास्तव ही निविदा रद्द करण्यात आली असली तरी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.