_MPC_DIR_MPU_III

Pune : महामार्गावर लूटमार करणारी आंतरराज्य टोळी ‘एलसीबी’च्या जाळ्यात; चार कोटी 91 लाखांचा मुद्देमाल जप्त

Interstate gang looting on highways caught by LCB; Four crore 91 lakh items confiscated

एमपीसी न्यूज – महामार्गावर दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या सात जणांच्या आंतरराज्य टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींकडून चार कोटी 51 लाख 58 हजार 400 रुपयांचे सिगारेट, दोन कंटेनर असा एकूण चार कोटी 91 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनेश वासुदेव झाला (वय 50), सुशील राजेंद्र झाला, मनोज केशरसिंग गुडेन, मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया, ओमप्रकाश कृष्णा झाला, कल्याण सदूल चौहान, सतीश आंतरसिंग झांजा (सर्व रा. देवास, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत परिसरात एक कंटेनर हायजॅक करून औषधे लुटून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास यवत पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला. हे आरोपी मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.

तपास करत असताना एलसीबीच्या पोलिसांना चौफुला येथून शिरूरकडे विनानंबर प्लेटचा एक संशयित ट्रक जाताना आढळला. पोलिसांना त्या ट्रकमध्ये संशयित आरोपी असल्याचे दिसले.

त्यानुसार, पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरु केला. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगात अहमदनगरच्या दिशेने पळवला. दरम्यान, पोलिसांना आणखी एका संशयित ट्रकची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही ट्रकचा पाठलाग सुरु केला.

पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काबुगडे, पोलीस कर्मचारी जितेंद्र मांगडे, सुदाम खोडदे, कल्पेश राखुंडे यांच्या पथकाला शिरूर येथील सतराकमान पूल येथे नाकाबंदी करून ट्राफिक जॅम करण्यास सांगितले. शिरूर पोलिसांनी ठरल्याप्रमाणे चौकात ट्राफिक जॅम केले. या ट्रॅफिकमध्ये संशयित आरोपींचा ट्रक अडकला.

उसाच्या शेतातून आरोपींना केली अटक

ट्राफिकमध्ये अडकलेल्या एका ट्रकमधील आरोपी उडी मारून पळून गेला. तर दुस-या ट्रकमधील आरोपीने रस्त्याचा संरक्षक कठडा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दुस-या ट्रकमधील संशयित आरोपी देखील ट्रकमधून उडी टाकून शेजारी असलेल्या उसाच्या शेतात जाऊन लपला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. रात्री अंधार झाल्याने पोलिसांनी उसाच्या शेतावर रात्रभर खडा पहारा ठेवला. त्यानंतर सकाळी उसाच्या शेतात शोधून सात जणांना ताब्यात घेतले.

चार कोटी 91 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून चार कोटी 51 लाख 58 हजार 400 रुपयांचे सिगारेट, 13 हजार 600 रुपये रोख रक्कम, सहा मोबाईल फोन, दोन ट्रक, एक बनावट रिव्हॉल्वर, बनावट नंबर प्लेट व अंक, एक चॉपर, चाकू असा एकूण चार कोटी 91 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींकडे चौकशी केली असता आरपींनी सिगारेटने भरलेला कंटेनर हायजॅक करून चालकाला शस्त्राचा धाक दाखवला. चालकाला टेंभूर्णी येथे सोडून दिले. याबाबत एका चालकाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा उघडकीस आला आहे.

अटक आरोपी कुख्यात व सराईत गुन्हेगार

अटक केलेले आरोपी आंतरराज्य टोळीतील कुख्यात व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण परिसरात शिक्रापूर, यवत परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींनी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना शक्यता आहे.

या पथकाने केली कारवाई

ही चित्तथरारक कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमण, पोलीस कर्मचारी राजू मोमीन, जनार्दन शेळके, महेश गायकवाड, उमाकांत कुंजीर, मुकुंद अयाचित, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, अनिल काळे, रविराज कोकरे, विजय कांचन, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, गुरु जाधव, रौफ इनामदार, धीरज जाधव, प्रमोद नवले, सावंत, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1