Pune : जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने मारली बाजी

तब्बल 111 शहरांमध्ये पुणे अव्वल

एमपीसी न्यूज – देशात जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर महाराष्ट्राने मोहोर उमटवली आहे. तर पहिल्या 50 शहरांच्या या यादीत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला स्थान मिळू शकलेले नाही.

हे सर्वेक्षण देशातील 111 शहरांमध्ये करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सुरी यांनी सांगितले. या यादीत चेन्नईला १४ वा क्रमांक मिळाला आहे. कोलकाताने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता.

केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास केवळ चंदिगडला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. चंदिगडला पाचवा क्रमांक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा ही शहरेदेखील पहिल्या दहांमध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे चौथा आणि नववा क्रमांक मिळवण्यात यश आले आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुधारावे,
यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. शहरातील संस्था, प्रशासन, मूलभूत सुविधांचा दर्जा लक्षात घेऊन जगण्यायोग्य शहरांची यादी तयार केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.