Pune : कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्या; पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी

एमपीसी न्यूज – ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर कामकाज करताना ओळखपत्र नसल्याने पोलिसांच्या बेदम मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यात सात हजार कंत्राटी कामगार गेली १० ते १२ वर्षापासून काम करत आहे. कंत्राटी कामगारांना टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना सफाईचे अवजारे व गणवेश, ओळखपत्र, वेतन चिठ्ठी, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय व आपघाती विम्याची रक्कम भरावी, असे असतानाही संबंधीत ठेकेदार कोणत्याही प्रकारचे संरक्षक साधने दिली जात नाही.

रविवार (दि. २२/३/२०२० रोजी) येरवडा क्षेत्रिय कार्यालयाकडे अत्यावश्यक सेवेत कचरा वाहतूक विभागात काम करणारा कंत्राटी सेवक प्रतिक केगळे यांना सकाळी कामावर जात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली. अंगावर खाकी गणवेश होता, पण त्याच्याजवळ ओळखपत्र नव्हते म्हणून पोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली. आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यासंबधी संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने भाग पाडावे अशी, मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.

कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रश्नांच्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी करून देखील संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप युनियनच्या जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तेही अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगारांना ओळखपत्र नाही, या कारणावरून पोलिसांनी मारहाण करावी ही प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मानवाला ग्रासून मृत्यूने थैमान घातले आहे.

अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीने सफाई करणाऱ्या कामगारांच्या जीवावर सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा जीवावर उठत असेल, तर युनियन म्हणून कदापीही अन्याय सहन करणार नाही. पोलीस यंत्रणेला सुध्दा पुणे महानगरपालिका कामगार युनियनने नम्र आवाहन केले आहे की, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कंत्राटी कामगारांना मारहाण करू नये. तसेच सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.