Pune : सत्तेवर असलेल्या भाजपने आंदोलन करणे दुर्दैवी नव्हे निषेधार्ह : रमेश बागवे

Pune: It is not only unfortunate but also condemnable that the ruling BJP is protesting: Ramesh Bagwe

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष पुणे महापालिकेत सत्तेत असताना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी झाल्याबद्दल आंदोलन करणे, हे केवळ दुर्दैवी नाही तर निषेधार्ह असल्याची टीका   काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी  केली  आहे.

बागवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशभरात स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नांवर मोदी सरकारला आलेले अपयश आणि होत असलेली बदनामी तसेच अर्थव्यवस्थेत आलेले अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांचा आदेश मानून महापालिकेत सत्तेत असतानाही भाजप आंदोलन करीत आहे.

वास्तविक पुणे महापालिकेचे अधिकारी, आरोग्य खात्याचे प्रमुख, त्यांचे अधिकारी, सफाई कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्ध योद्धा म्हणून लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत केवळ राजकारण म्हणून असे आंदोलन छेडणे हे किती योग्य आहे, हे त्यांनी ठरविले पाहिजे.

पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून सर्व अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांचे या आंदोलनामुळे मनोबल कमी होऊ शकते, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. देशपातळीवर चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन करणे, लोकांना संधी न देणे, राज्यांशी योग्य वेळी चर्चा न करणे, केंद्रीय पध्दतीने निर्णय राबविणे, या बाबी भाजप विसरले आहे, याची आठवण बागवे यांनी करून दिली आहे.

कोरोनाचा या संकट काळात सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या व जनतेच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडून महाराष्ट्रात काही आर्थिक मदत आणता येईल का, याचा विचार करण्याऐवजी भाजप खासदार आंदोलनाचा पवित्रा घेतात, ही बाब अनाकलनीय असल्याचेही बागवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.