Pune : शरद पवारांना वारंवार मातोश्रीवर जावे लागणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील

It is not right for Sharad Pawar to visit Matoshri frequently: Chandrakant Patil :पवार यांच्या वयाचा मान ठेवून मुख्यमंत्र्यांनीच त्यांना भेटायला गेले पाहिजे होते.

एमपीसी न्यूज –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वारंवार मातोश्रीवर जावे लागणे बरोबर नाही. पवार यांच्या वयाचा मान ठेवून मुख्यमंत्र्यांनीच त्यांना भेटायला गेले पाहिजे होते, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. 2004 साली प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे शिवसेनेचे मते मागायला पवार मातोश्रीवर गेल्याची आठवणही पाटील यांनी करून दिली.

आज, मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे महानगर जिल्ह्याचे प्रभारी गणेश बिडकर उपस्थित होते.

कोरोनाला रोखण्यासाठी काळजी घ्यावी, आता लॉकडाऊन परवडणार नाही. प्रसंगी नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी लागेल, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

तर, सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या स्वतंत्र निवासाची सोय सामाजिक संस्थांनी करावी. आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सुविधा त्यांना द्याव्यात.

300 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची राहण्याची मोफत सोय शहरातील विविध हॉटेलमध्ये भाजपातर्फे करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. मराठा आरक्षणाची केस राज्य शासनाने ताकदीने चालवावी. त्याला कुठल्याच परिस्थितीत स्टे मिळू नये, त्यासाठी सरकारने विरोधी पक्षाला सोबत घ्यावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

विद्यार्थांचे शुल्क भाजप सरकारने भरले होते. पण, यावर्षी हे सरकार काय करणार माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा दिल्याने काहीही होणार नाही. त्यापेक्षा रचनात्मक काहीतरी करुन ‘सारथी’चा प्रश्न मार्गी लावा, असे आवाहन पाटील यांनी राज्य शासनाला केले.

कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडतच नाहीत. आतापर्यंत ते दोनदा बाहेर पडले. मातोश्रीवरही ते कुणाला भेटत नाहीत. मुख्यमंत्री असताना असे कसे चालेल, असा सवाल उपस्थित करून पाटील यांनी मुख्यमंत्री  ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.