Pune : पुण्यातील बांधकामांसाठी आता एसटीपीचे पाणी वापरणे बंधनकारक, अॅपद्वारे पुरवले जाणार पाणी

एमपीसी न्यूज : धरणसाठ्यांतील कमी होणारा (Pune) पाणीसाठा व पाण्याचा वाढता वापर यावर उपाय म्हणून पुणे महापालिकेने नवीन उपाययोजना हाती घेतली आहे. यामध्ये पुणे परिसरात जे काही बांधकामे सुरु आहेत त्यांना आता एसटीपी म्हणजे सिव्हेज ट्रिटमेंट प्लान्टमध्ये प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक आहे. तशा सुचना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केल्या आहेत.
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरात सुरू असणाऱ्या सर्व बांधकामांना आता प्रक्रीया केलेले पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. यासाठी पुणे महापालिकेने pmcstpwatertanker हे app विकसीत केले आहे. या app चे आज (सोमवारी) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यासाठी बांधकाम व्यावसायिकांना app वर आपले नाव, साईट निहाय नोंदवायचे आहे. एसटीपीचे पाणी हवे असणाऱ्या बांधकाम साईटला पाणी टँकरद्वारे पुरवले जाणार आहे. तशा app मध्ये टँकर मालकांचीही नोंदणी करण्यात आली आहे. उपलब्ध टँकर मालकांच्या यादीमधून टँकर पाणी पुरवठा संबंधीत साईटला पुरवठा करेल. याचे शुल्क बांधकाम व्यावसायिकाना टँकर मालकांना द्यावे लागणार आहे.
या (Pune) नियमानुसार आता बांधकाम व्यावसायिकांना बांधकामासाठी पिण्याचे, बोअरवेलचे, विहरीचे पाणी वापरता येणार नाही. ज्या विकसकामार्फत असे पाणी वापरेल जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई महापालिका करणार आहे. तसेच पुणे महापालिकेच्या विविध खात्यामध्ये जी काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत, त्यांनाही एसटीपीचे पाणी पुरवले जाणार आहे, असे या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.