Pune: राज्यात साधू, संत, महाराज सुरक्षित नाहीत हे दुर्दैवी – चंद्रकांत पाटील

Pune: It is unfortunate that sadhus, saints and maharajas are not safe in the state - Chandrakant Patil

एमपीसी न्यूज – पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने दोन साधूंची हत्या केली. या घटनेनंतर महिनाभरातच नांदेड जिल्ह्यात मठाधिपतींची व त्यांच्या सहकाऱ्याची मठातच हत्या झाल्यामुळे राज्यात साधू, संत, महाराज सुरक्षित नाहीत असा दुर्दैवी संदेश गेला आहे, अशी संतप्त टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

नांदेड जिल्ह्यात नागठाणा येथील मठाधिपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या निर्घृण हत्येने आपल्याला धक्का बसला, असे सांगत  महाराष्ट्र प्रांत भारतीय जनता पार्टी वतीने आपण महाराजांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले की, निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांनी विविध सेवाकार्याच्या माध्यमातून गावाचा कायापालट केला होता. त्यांनी मठामध्ये अन्नछत्रही सुरू केले होते. त्यांच्याबद्दल सर्व समाजामध्ये आदर होता. महाराजांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी भाजपाची मागणी आहे.

मठाधिपतींच्या हत्येबाबत गावकऱ्यांनी ज्या आरोपीबद्दल संशय व्यक्त केला आहे, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे गावकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी वेळीच त्या संशयितावर कारवाई केली असती तर आजचा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता, अशी तक्रार आहे. या हत्या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि दोषींना कठोर शासन होईल यासाठी कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.