Pune : कोरोना; आयटी कर्मचाऱ्यांचा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ला नकार

एमपीसी न्यूज : येत्या २० तारखेपासून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्या चालू कराव्यात, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. मात्र, पुणे हे ‘कोवीड-19 चे ‘हॉटस्पॉट’ असल्याने आयटी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये जावून काम करण्यास नकार दिला आहे. उलट ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत चालू ठेवण्यासाठी हे कर्मचारी आग्रही आहेत.

यासंदर्भात ‘द पुणे चाप्टर ऑफ द फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ या संघटनेने पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आम्ही आदर करतो. परंतु, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनची मुदत संपेपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी मिळावी, अशी आमची मागणी आहे.

बहुतेक आयटी कर्मचारी मोठ्या सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये रहात आहेत. ते रहात असलेले भाग संसर्गापासून आत्ता तरी दूर आहेत. कामानिमित्ताने सोसायट्यांबाहेर जाणे-येणे राहिले तर संसर्गाची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर काही फ्लॅटमध्ये चार, पाच रूम पार्टनर्स एकत्र रहातात. त्यांनाही संसर्ग होण्याची भिती आहे. या गोष्टी लक्षात घेऊन संसर्ग टाळण्याच्यासाठी म्हणून सगळे निर्बंध उठेपर्यंत ऑफिसमधून काम करण्याऐवजी घरून काम करण्याची पद्धतच चालू ठेवण्यात यावी, अशी त्यांची मागणी असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.