Pune: जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्याचे वेतन रखडले!

एमपीसी न्यूज – जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे चार महिन्याचे वेतन विनाकारण रोखल्याचा आरोप बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने केला आहे. चार महिन्याचे वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचा-यांची उपासमार झाली आहे. कर्मचारी प्रचंड आर्थिक त्रास सहन करत लॉकडाऊनमध्ये जीवन जगत आहेत. त्यामुळे तातडीने वेतन अदा करावे अशी विनंती केली आहे.

याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, दिव्यांग आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहेय त्यात संघाचे अध्यक्ष प्रा. गौतम बेंगाळे यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय विभाग व अपंग कल्याण आयुक्तालयाकडून जीवनधारा मतिमंद विद्यालयाचे नुतनीकरण 31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात आले आहे. तत्कालीन अपंग आयुक्त बालाजी मंजुळे यांनी 2 मार्च 2019 रोजी नुतनीकरण प्रमाणपत्र जारी केले आहे.

परंतु, पुणे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा डिसेंबर 2019 ते मार्च 2020 असे चार महिन्याचे वेतन अदा केले नाही. जिल्ह्यातील इतर अपंगांच्या अनुदानित शाळांचे वेतन नियमित अदा केले जात असताना जीवनाधारा या शाळेचे बेकायदेशीरपणे, जाणून-बुजून पगार रोखून कर्मचा-यांना नाहक वेठीस धरले जात आहे. यापुर्वी सुद्धा विनाकारण चार महिन्याचे वेतन थांबविले होते.

वारंवार होणा-या आर्थिक त्रासाला कर्मचारी कंटाळले आहेत. इच्छा मरणाची भाषा व्यक्त करत आहेत. त्यामुळे तातडीने वेतन अदा करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.