Pune : बीआरटी देखरेख समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ; जुगल राठी यांचा देखील राजीनामा

एमपीसी न्यूज- पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी बीआरटी देखरेख समितीचा राजीनामा दिला आहे. या समितीची काही महिन्यांपासून बैठकच झालेली नाही. ही समिती नावालाच उरली असून, काही काम होत नसल्याने राजीनामा देत असल्याचे राठी यांनी सांगितले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्यांनी राजीनामा पाठविला आहे. काही दिवसांपूर्वी नागरिक चेतना मंचाच्या कनिझ सुखरानी यांनी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ जुगल राठी यांनीही राजीनामा दिल्याने समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीआरटी मार्गाची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या समितीची स्थापना मार्च २०१८ मध्ये करण्यात आली. मात्र, गेल्या सहा महिन्यांत केवळ एका मार्गाची पाहणी या समितीमार्फत करण्यात आली, तसेच यावेळी दिलेल्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. समिती नावालाच उरली आहे. दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने या समितीचा राजीनामा देत असल्याचे राठी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.