Pune : जंगलाची सफर घडवणारी छायाचित्रे-वानखेडे

रिवा, कला-मोहल्ला आयोजित तीन दिवसीय वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- “तरुणांनी काढलेली ही वन्यजीवांची छायाचित्रे जंगलाची सफर घडवणारी आहेत. वन्यजीवांची शैली आणि जीवन उलगडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून झाला आहे. छायाचित्रांबरोबरच त्यामागची गोष्ट येथे माहिती स्वरूपात लावल्याने ही छायाचित्रे अधिक भावतात,” असे प्रतिपादन वनाधिकारी आर. के. वानखेडे यांनी केले.

रिवा, कला-मोहल्ला आणि ऍडव्हेंचर मंत्रा यांच्या वतीने आयोजित युवा छायाचित्रकारांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात भरले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी वानखेडे बोलत होते. प्रसंगी चित्रकार धनंजय देशपांडे, संयोजक माधव गोडबोले, मानस गोडबोले, संजय जोशी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार, दि. 24 जानेवारीपर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे या युवा वन्यजीव छायाचित्रकारांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत. या चारही छायाचित्रकारांनी काढलेली जवळपास ३० पेक्षा अधिक छायाचित्रे सविस्तर माहितीसह पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तनय गुमास्ते याने रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत.

धनंजय देशपांडे म्हणाले, “प्रदर्शनातील छायाचित्रे उत्तम आहेत. परंतु, या छायाचित्रांच्या माध्यमातून अर्थार्जन होणेही तितकेच महत्वाचे आहे. छायाचित्रातील बारकावे नेमकेपणाने मांडले आहेत. छायाचित्र टिपतानाची परिस्थिती शब्दबद्ध केल्याने प्रदर्शन पाहताना वन्यजीवांचे जगणे कळायला सोपे जाते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.