BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा- खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज- पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यापूर्वी देखील अनेकदा आरोप झाले आहेत. आता तर दोषी ठरलेल्या रेशन दुकानदाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी न्यायालयाने बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांनी आता चौकशी होईपर्यन्त वाट न पाहता राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

बीडमधील मुरंबी गावातील दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र त्यांनी कर्तव्यपालनात कसूर केल्याचे या प्रकरणात स्पष्ट दिसत आहे. गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केले’ अशा शब्दात न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. या पूर्वी युती न झाल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित असल्याचे विधान खासदार काकडे यांनी केले होते. आता या दोन्ही विधानाची दखल भाजपकडून कशी घेतली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.