Pune : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित ‘कळसूबाई शिखर चढाई मोहीम’ फत्ते; मोहिमेमध्ये 94 तरुणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – माउंटन एज ॲडवेंचर्स आणि वाईल्ड ट्रेल्स, पुणे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या ” कळसूबाई ” येथे रविवारी (दि. 12 जानेवारी 2020 रोजी) शिखर चढाई मोहीम आयोजित केली. या मोहिमेमध्ये एकूण 94 तरुणांनी सहभाग घेतला होता. पायथ्याशी असलेल्या बारी या गावातून सगळ्या तरुणांनी सकाळी 7 वाजता कळसूबाई शिखर चढाई करण्यास सुरूवात केलो. दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्यांनी हे शिखर चढून सर केले. 

कळसूबाई शिखर हे सह्याद्री डोंगररांगातील सगळ्यात उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1646 मीटर (5400फूट) आहे. हे शिखर कळसूबाई – हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य, अहमदनगर जिल्यातील अकोले तालुकामध्ये आहे.

शिखरावर असलेल्या कळसूबाई देवीचे सर्वांनी दर्शन घेऊन शिखरावरुन दिसणाऱ्या हरिश्चंद्रगड, रतनगड व भंडारदरा डॅमची माहिती संस्थेचे सल्लागार व ट्रेक एक्सपर्ट मंदार थरवल यांनी दिली. तसेच ब्लॉग व्रायटर दिपू साने यांनी ट्रेक व्यवस्थापनामधे महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच रोहित नागलगाव यांनी संस्थेचे पुढील आयोजित कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली व सर्पमित्र संजय निकाळजे यांनी सर्वांना शिखर चढाई दरम्यान योग्य मार्गदर्शन केले. अशा पध्दतीने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कळसूबाई शिखर मोहिमेत सहभागी झालेल्या 94 तरुणांनी एक दिवस मोबाईलपासून दूर राहुन व निसर्गाच्या सानिध्यात, सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर सर करून साजरा केला.

या मोहीमेचे आकर्षण ठरले ते म्हणजे जागतिक पातळीवर सायकलिंगमध्ये विश्वविक्रम केलेले संतोष होळी यांनी सहभागी होऊन सगळ्यांना ट्रेकिंगसाठी प्रवृत्त केले. सह्याद्रीच्या मातीमधे जन्मलेल्या प्रत्येक तरुणाला हे शिखर सर करण्याचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी माउंटन एज ॲडवेंचर्स व वाईल्ड ट्रेल्स, पुणे संस्थेच्या कळसूबाई शिखर मोहीमेच्या माध्यमातून मिळाली. म्हणून सहभागी सर्व तरुणानी आनंद व्यक्त केला.

हे शिखर सर करताना आपल्याकडून कसल्याही प्रकारचा कचरा होणार नाही, याची काळजी घेतली. शिखराजवळ असलेल्या विहिरीतील कचरा काढून विहीर स्वच्छ करण्याच महत्त्वाच काम या तरुणांनी केल. येणाऱ्या काळात असेच अनेक दुर्ग मोहिमा राबविण्याचा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक अनिल जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.