Pune : प्रवीण उद्योग समूहाच्या आधारवड कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज- ‘प्रवीण’ उद्योग समूहाच्या आधारवड कमलबाई हुकमीचंद चोरडिया (वय 86) यांचे मंगळवारी (दि. 11) वृद्धापकाळाने निधन झाले. गुलटेकडी परिसरातील राहत्या घरी त्यांनी संध्याकाळी 7 च्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात चार मुले राजकुमार, प्रवीण, प्रदीप आणि धन्यकुमार तसेच विशाल, आनंद, अमित आणि गौरव हे नातू यांच्यासह नातवंडे आणि पतवंडांचा मोठा परिवार आहे. आज, बुधवारी सकाळी दहा वाजता मोतीबाग सोसायटी येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पुण्यातील भंडारी कुटुंबातील असलेल्या कमलबाई या सुमारे 68 वर्षांपूर्वी विवाहानंतर चोरडिया कुटुंबामध्ये आल्या होत्या. कमलबाई यांनी हुकमीचंद यांच्या सोबतीने 58 वर्षांपूर्वी म्हणजे 1962 साली प्रवीण उद्योग समूहाचा पाया रचला. त्यांच्या या कारकीर्दीवर ‘बिकट वाट यशाची’ या नावाने त्यांच्या स्नुषा मधुबाला चोरडिया यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तकही प्रसिद्ध आहे. प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘मसाला’ हा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता.

अत्यंत कुटुंबवत्सल असलेल्या कमलबाई यांना सर्वजण ‘बाई’ या आदरार्थी नावाने संबोधत असत. विविध सामाजिक संस्थांशी देखील त्या अनेक वर्षे जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना आणि मंडळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.