Pune : पोलिसांनीच केले कन्यादान ; हडपसरमध्ये पार पडला अनोखा लग्न सोहळा

एमपीसी न्यूज – अनेकांचे विवाह सोहळे लॉकडाऊनमूळे रद्द झाले तर काही तात्पुरते स्थगित केले आहेत. काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने लग्न उरकले जात आहे, तर काही ठिकाणी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला जात आहे. पुण्यातील हडपसर येथे मात्र, पोलिसांनीच कन्यादान करत जोडप्याचा विवाह लावून दिला आहे.

देहराडून येथे लष्करात कार्यरत असलेले कर्नल देवेंद्रा सिंग यांचा मुलगा अदित्य सिंग आणि नागपूर येथील लष्कराच्या मेडीकल कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असणारे अरविंद सिंग कुशवाह यांची मुलगी डॉ. स्नेहा कुशवा यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. लग्नासाठी मे महिन्याच्या 2 तारखेचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्नला अडथळे येत होते. दोन्हीही कुटुंब देहराडून आणि नागपूर येथे लाॅकडाऊनमुळे अडकून पडले असल्यामुळे त्यांना कुठेही हालचाल करणे शक्य नव्हते.

त्यामुळे वधू-वराच्या कुटुंबीयांनी पुण्यामधील हडपसर येथील पोलिसांना संपर्क साधून हडपसर येथेच वास्तव्यास असणाऱ्या वधू स्नेहा आणि वर आदित्य यांचा विवाह लावून देण्याची विनंती केली. या विनंतीची पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारी यांनी तात्काळ दखल घेऊन विवाहाची तयारी केली. पोलिसांनी नातेवाईकांची भूमिका पार पाडत ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहिताच्या मदतीने विवाह लावून दिला. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांनीच मुलीचे कन्यादान सुद्धा केले.

पोलिसांनी अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवत हा विवाह सोहळा विधीवत पार पाडला. यावेळी वधू-वरांचे आई वडिल आणि नातेवाईक यांच्या भूमिका पोलिसांनीच बजावल्या. लग्न स्थळी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करण्यात आले. तसेच कोणतीही गर्दी होणार नाही याची योग्य काळजी घेण्यात आली होती. पोलिसांच्या या उपक्रमाचे व दाखवलेल्या माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वधू व वराचे वडील लष्करी सेवेत असल्यामुळे त्यांना लग्नाला उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. तसेच त्यांनी लग्न लावून देण्यासंदर्भात केलेल्या विनंतीची तात्काळ दखल घेऊन आम्ही लग्नाची तयारी केली. ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितांना बोलून विधीवत त्यांचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी पोलिसांनी सर्व भूमिका चोख पार पाडल्या. – प्रसाद लोणारी- पोलीस निरीक्षक.

 

आमच्या लग्न सोहळ्यात पोलीसच आमचे आई-वडील झाले होते आणि सर्व जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमचे विधिवत लग्न लावून दिले. या लग्नसमारंभात कुठेही आम्हाला कुटुंबियांची कमतरता भासली नाही. पोलिसांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल आम्ही पोलिसांसह महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो. – आदित्य सिंग – वर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.