Pune News: ‘कापूरहोळ- भोर रस्त्याला विनोदवीर दादा कोंडके यांचे नाव द्या’

'संभाजी ब्रिगेड'ची राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी : 'Kapurhol-Bhor road should be named after Vinodveer Dada Kondke'

एमपीसीन्यूज : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे दिवंगत विनोदी अभिनेते, दिग्दर्शक दादा कोंडके हे महाराष्ट्राचं वैभव आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा ‘आरसा’ म्हणून दादांकडे पाहिलं जातं.  सलग  नऊ चित्रपट सुपरहिट करुन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड गिनिज बुक मध्ये नाव नोंदवणाऱ्या शाहीर दादा कोंडके यांचे नाव कापुरहोळ ते भोर या मार्गाला देण्याची मागणी भोर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

भोर तालुक्याची शान कृष्णा उर्फ दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगष्ट 1932  रोजी भोर तालुक्यातील इंगवली येथे झाला.  दादा कोंडकेंनी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही संपवली. सर्वसामान्य कलाकार मोठा केला व झाला.

विशिष्ट वर्गाच्या लॉबिंगला दादा कोंडकेंनी नेहमी लांब ठेवले. त्यांनी क्वालिटीला खूप महत्त्व दिले. मात्र, भोर तालुक्यातील राजकीय व सामाजिक नेतृत्वाने त्यांची कधीच किंमत केली नाही हे दुर्दैवी आहे.

राज्य सरकारने दादा कोंडके यांचे मोठे राष्ट्रीय स्मारक भोरमध्ये उभारणे गरजेचे आहे. दादा कोंडके हे महाराष्ट्राचे भूषण आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीला पडत्या काळामध्ये नऊ चित्रपट सुपरहिट दिले ते दादा कोंडके यांनीच. मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस दादा कोंडके यांच्यामुळे आलेले आहेत.

दादांच्या चित्रपटांनी सबंध महाराष्ट्राला थोड्या कालावधीत एकच भुरळ घातली. नट कसा असावा याचं अद्वितीय उदाहरण हे दादा कोंडकेंनी आपल्या कलेतून दाखवून दिलं.

म्हणून ‘कापुरहोळ ते भोर फाटा ते भोर या रस्त्याला ‘ नटसम्राट दादा कोंडके यांचे नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.