Pune : केईएम हाॅस्पिटल, क्लब फूट मेडिकल फाउंडेशनतर्फे मोफत अस्थिव्यंग उपचार शिबिर

एमपीसी न्यूज – केईएम हाॅस्पिटलचे डिपार्टमेंट आॅफ आर्थोपेडिक्स, दाबके ट्रस्ट आणि क्लब फूट मेडिकल फाउंडेशनतर्फे अस्थिव्यंग असलेल्या लहान मुलांसाठी मोफत अस्थिरोग तपासणी व सवलतीत शस्त्रक्रिया शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. येत्या दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. ते ३ वाजेपर्यंत, ओपीडी क्र. १०, केईएम हाॅस्पिटल, पुणे, येथे हे शिबिर होणार असल्याचे डाॅ. समीर देसाई यांनी सांगितले.

डाॅ. समीर देसाई लहान मुलांचे स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ज्ञ असून त्यांनी आपले प्रशिक्षण आस्ट्रेलिया व कोरिया येथून घेतले आहे. शिबिराबाबत माहिती देताना डाॅ. देसाई म्हणाले की आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेकदा बऱ्याच व्यक्तींना आपल्या लहान मुलांवर वैद्यकीय उपचार करता येत नाहीत. अशा रुग्ण लहान मुलांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत शस्त्रक्रियेची सुविधा या शिबिरात उपलब्ध होणार आहे. रुग्णांच्या पालकांनी या शिबिराचा फायदा घेणे गरजेचे आहे.

या शिबिराबाबत अधिक माहिती देताना डाॅ. देसाई म्हणाले की या शिबिरात सेरेब्रल पाल्सी, क्लब फूट (पंजे आत वळलेले असणे), बो लेग्ज, नाॅक निस, क्युबाईट वारस, पोलिओ, चिकटलेली बोटे व हाताचे इतर आजार यांबाबतची तपासणी होईल. यापैकी काही आजार मुलांमध्ये जन्मतःच आढळतात व काही आजार वय वाढेल तसे उद्भवतात. वरीलपैकी अनेक आजार ९० टक्क्यांपर्यंत बरे होऊ शकतात. गेली ८ वर्षे केईएम रुग्णालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो.

या शिबिरात नावनोंदणीसाठी पालकांनी ०२०- ६६०३७४६०, ९१-८३७८९८००२१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केईएम रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.