Pune : खडकवासला धरण 100 टक्के भरले

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.

टेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमधून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या धरण क्षेत्रात पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पुण्याच्या टेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या चार प्रमुख धरण क्षेत्रात सरासरी 66.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

सततच्या पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 74.49 टक्के, वरसगाव 58. 88 टक्के आणि टेमघर 52.3 टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल 5 हजार 136 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सतत पाण्याचा विसर्ग सुरु राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.