Pune : अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध, उपचार अन् पुन्हा अपहरण!

ससून रुग्णालयातील प्रकार

एमपीसी न्यूज – …… एका अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. घरच्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन् पोलिसांनी आरोपी शोधून त्याला बेड्याही ठोकल्या. मुलीला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर मुलगी घरच्यांसोबत रुग्णालयाच्या बाहेर पडली. आई मेडिकलमध्ये औषधे घेत असताना अज्ञातांनी मुलीचे पुन्हा अपहरण केले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पुणे शहरात घडली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 एप्रिल रोजी एका 16 वर्षीय मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. घरच्यांनी याप्रकरणी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञाताविरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळाची पाहणी करत कसून चौकशी केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत एका तरुणाला 7 एप्रिल रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करत त्याला बेड्याही ठोकल्या. त्याच्यावर कारवाई करत त्याची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली.

  • आरोपीसोबत तरुणीचा देखील शोध लागला होता. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय तपासण्या झाल्या. दरम्यान तिचा रक्तदाब (बीपी) अतिशय कमी झाला असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी मुलीला पुन्हा काही दिवसांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. त्यानुसार मुलीला काही दिवसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुलीवर आवश्यक उपचार आणि वैद्यकीय तपासण्या झाल्या. उपचार पूर्ण झाल्याने तिला ससून रुग्णालयातून मंगळवारी (दि. 29 मे) रोजी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्याने मुलगी तिच्या आईसोबत रुग्णालयाबाहेर पडली. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या औषधांच्या दुकानात मुलीची आई औषधे घेण्यासाठी गेली. त्यावेळी मुलगी औषधांच्या दुकानाजवळ थांबली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्या मुलीचे पुन्हा अपहरण केले.

  • आई औषधे घेऊन आली असता तिची मुलगी तिला दिसली नाही. आईने रुग्णालय परिसरात सर्वत्र मुलीचा शोध घेतला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर देखील मुलगी सापडत नसल्याने आईने तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत पुन्हा मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. अपहरण झालेल्या मुलीचा एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शोध घेतला. आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुन्हा मुलीचे अपहरण झाले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे म्हणाले, “एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता. त्यामध्ये पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला अटक करत त्याची तुरुंगात रवानगी केली.

  • मुलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला फेरतपासणी तसेच पुढील वैद्यकीय उपचारासाठी पुन्हा बोलावले होते. उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून मुलीला डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यावर हा अपहरणाचा प्रकार घडला आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलिसांचे दुर्लक्ष होण्याचा प्रकार नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.