Pune : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- बहिणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्या नवऱ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. नऱ्हेगाव ते सातारा जिल्ह्यातील माण उक्कडगाव घाटापर्यंत आरोपींचा एखाद्या चित्रपटात शोभावा असा पाठलाग करून पोलिसांनी अपहृत पतीची सुटका केली. 

नंदू कऱ्हाडे आणि नवनाथ काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विजय श्रीकांत दबडे (वय 28, रा.) असे सुखरुप सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा विजय दबडे (वय 25) या कामानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांची ओळख जिममध्ये काम करणाऱ्या विजय सोबत झाली. ओळखीनंतर दोघांनी प्रेमविवाह केला. या विवाहास विजयच्या परिवाराची साथ होती मात्र शोभाच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता. लग्न झाल्यानंतर तिने घरी वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर शोभाचे वडील आणि नातेवाईकांनी शोभा आणि विजय यांना धमकावले होते.

बुधवारी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे विजय कामाला गेला. मात्र तो जिममध्ये आला नसल्याने जिममधील एकाने शोभाला फोन करून सांगितले. त्यामुळे शोभाने तिच्या दिराला विजयला पाहण्यासाठी पाठवले. त्यावेळी विजयची गाडी रस्त्यावर आढळून आली त्या ठिकाणी चौकशी केली असता दोन तीनजणांनी विजयला मारहाण करीत होते आणि विजयला सोडविण्यासाठी गेलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून विजयला कारमध्ये घालून त्यांनी त्याचे अपहरण केल्याचे समजले.

त्याप्रमाणे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांना घटनास्थळी दोन मोबाईल सापडले त्यातील एक विजयचा तर दुसरा नवनाथ काळे याचा असल्याचे शोभाने सांगितले. पुणे पोलिसांनी त्वरित पावले उचलत मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा पाठलाग करून अखेर सातारा जिल्ह्यातील माण कुकडगाव घाटात आरोपीना जेरबंद करून विजयची सुखरूप सुटका केली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सरदार पाटील ,पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सोपान बालाजी साळुंके, ज्योती गडकरी, सचिन गवते, सुधीर घाडगे, विनोद महागडे, किरण देशमुख, संतोष सावत, राहुल शेडगे, प्रशांत काकडे, विजय पोळ, संग्राम शिनगारे, निलेश जमदाडे, रफिक नदाफ, किशेार शिदे, शिवानद कायगुडे, हरिष गायकवाड यांनी केली आहे.

विजय श्रीकांत दबडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.