Pune: ‘कोंढवे-धावडे’, ग्रामपंचायतीत ठराव करुन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणारं पहिलं गाव

Pune: Kondhwe-Dhawade, the first village to boycott Chinese goods by passing a resolution in the gram panchayat कोंढवे-धावडे गावात जागोजागी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज- सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय लष्करादरम्यान झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतरही चीनकडून दादागिरी केली जात आहे. देशात सध्या चीनविरोधात वातावरण असून ठिकठिकाणी चिनी साहित्यांची जाळपोळ केली जात आहे. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील कोंढवे-धावडे गावाने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुण्यालगत असलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे 15 हजार इतकी आहे. गावात एकही चिनी वस्तू न वापरण्याचा ग्रामपंचायतीत ठरावच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येत्या 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोंढवे-धावडे गावात जागोजागी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांना दवंडी देऊन याबाबत सांगितले जात आहे.

गावातील व्यापारी, दुकानदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी कळवण्यात आले आहे. ग्रामस्थांमध्ये जागृती करण्याबरोबरच स्वतः ग्रामपंचायतीनेही याची अंमलबजावणी केली जात आहे. प्रशासकीय कामकाजासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य भारतीय बनावटीचे वापरले जाणार आहेत.

त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत अथवा शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही कामासाठी चिनी वस्तूंचा वापर केला जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी यापूर्वी खरेदी केलेल्या वस्तू विकण्याची मुभा देण्यात आली आहे.

सुरुवात होणं आवश्यक होतं

यासाठी कुठूनतरी सुरुवात होणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही विचार करुन हा ठराव केला. याला इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. हे किती शक्य होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे सरपंच नितीन धावडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.