Pune : कोथरूड – बावधन, औंध, बाणेर, वारजे परीसरातील नागरिकांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत कोरोनाचे संकट गंभीर होत असताना कोथरूड – बावधन, औंध – बाणेर, वारजे – कर्वेनगर, सिंहगड रोड परिसरात कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आहेत. त्यामुळे या परिसराला लॉकडाऊनमधून  दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे  1423 रुग्ण झाले असून 81 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पुणे शहरात लॉकडाऊन अंशतः उठविण्यासाठी महापालिका विचार करीत आहे.  भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, येरवडा, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सहकारनगर, शिवाजीनगर – घुलेरोड परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.  झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या भागांतही  कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मे अखेर पर्यंत कोरोनाचे रुग्ण 10 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांतील साडेतीन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. यापैकी 71 हजार नागरिकांच्या स्थलांतर करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. मंगल कार्यालय, वसतिगृह, महापालिकेच्या शाळेत नागरिकांची सोय करण्यात येणार आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांतही औद्योगिक वसाहती सुरू होणार असल्याची चर्चा आहे. शिवणे – उत्तमनगर परीसरात कोरोना आटोक्यात आहे. नागरिक सक्तीने लॉकडाऊनचे पालन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस कडक उपाययोजना करीत असल्याने नागरिकांना लवकरच ‘गुड न्यूज’ मिळणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.